रिवा-इतवारी एक्स्प्रेसला तुमसर येथे थांबा केव्हा ?
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याला जोडणारी रेल्वे
तुमसर : पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागाच्या वतीने चालवण्यात येणारी रिवा-इतवारी एक्स्प्रेस महाराष्ट्र व मध्य प्रदेश...
more... राज्याला जोडणारी महत्त्वपूर्ण रेल्वे आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या पाच व दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या चार स्थानकात थांबणाऱ्या या गाडीला तुमसर रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत असंतोष दिसत आहे.
गोंदिया-बालाघाट- नैनपूर-जबलपूर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प नागपूरच्या किंबहुना विदर्भातील प्रवाशांसाठी जबलपूरपर्यंत स्वस्त दरात व सुरक्षित पोहोचण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
या मार्गामुळे उत्तर भारताचे अंतर सुमारे १५० किमीने कमी झाले. इतवारी ते रिवामार्गे गोंदिया-बालाघाट जबलपूर अशी इंटरसिटी एक्स्प्रेस आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच रविवार, मंगळवार व गुरुवारी धावते. इतवारी- रिवा इंटरसिटी सप्ताहातील तीन दिवस संध्याकाळी ६:३० वाजता इतवारीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:२० ला रिवा येथे पोहोचते. रिवा ते इतवारी ही गाडी सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस धावते. रिवा येथून सायंकाळी ५:२० ला सुटून परतीच्या प्रवासात इतवारीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७:२५ ला पोहचते.
सातपुडा नावाने प्रसिद्ध असलेल्या जबलपूर मार्गिकेवर नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यानंतर या मार्गावरील बहुप्रतिक्षित ही रेल्वे धावत आहे. या रेल्वेला तुमसर रोड रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
महाराष्ट्रातील फक्त दोन स्थानकात थांबे
रिवा-इतवारी ही एक्स्प्रेस रेल्वेला महाराष्ट्रातील फक्त दोन स्थानकात थांबे आहेत. इतवारी आणि नंतर थेट गोंदिया येथे थांबते. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहेत. एक्स्प्रेस २४ तास ५ मिनिटांच्या कालावधीत इतवारी व रिवा यांच्यासमवेत अन्य ७ रेल्वे स्थानकावर थांबत ४२ किलोमीटर प्रति तासाच्या सरासरी वेगाने ६०१ किलोमीटर अंतर पार करते. या गाडीच्या मार्गात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणारे इतवारी, गोंदिया जंक्शन, नैनपूर, पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या जबलपूर, कटणी, मैहर, सतना व रिया या स्थानकांचा समावेश आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकात थांबा दिल्यास मध्य भारतात जाणाऱ्या व्यापायांना फायदा होईल.